आपल्या जडण घडणीत, उत्कर्षात पालघरचे जिल्ह्याचे स्थान अनन्य साधारण आहे. आपण बाहेरगावी गेलो आणी संखे, वडे, पिंपळे, बोरे आडनाव सांगीतल्यास समोरचा माणुस पालघरचे का? असे विचारतोच, एवढे आपले आणी पालघरचे घट्ट नाते आहे. वास्तवीक आपल्या परिसरातील सर्व जातींच्या संघटना आपल्या संघटनेपुर्वीच स्थापल्या गेल्या आहेत. पालघर जिल्ह्यात कोळी-मांगेला, भंडारी, सोनार, सुर्यवंशी क्षत्रिय (कुणबी), सोमवंशी क्षत्रिय (वाडवळ) ह्या समाजबांधवांच्या वास्तु दिमाखात उभ्या आहेत. आजच्या संगणक युगात जातिची बंधने गळुन पडत असताना तुम्ही म्हणाल समाज मंडळाची आवश्यकता आहे काय?
पालघर, डहाणु, जव्हार तालुक्यातील २४ गावात वसलेला आपला वंजारी समाज पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील तसा अल्पसंख्य समाज. पन्नासच्या दशकातील अप्रगत समाजाने निव्वळ मेहनत, छोटा व्यापार(पालेमोड), बैलगाडी धंदा इ. व्यवसाय करुन साठच्या दशकात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करुन मुला बाळांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. साठच्या दशकात घरटी एक शिक्षक होता. वास्तविक शिक्षकी पेशा बिनवशिल्याचा व शेती सांभाळुन व्यवसाय, त्यामुळे साठच्या दशकात ह्या व्यवसायातील बहुतांशी मंडळींनी आपल्या कुटुंबीयांना, मुलींना, भगिनींना, मुलांना सुसंस्कारीत करुन उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सत्तच्या दशकात आपल्या समाजातील स्त्रीवर्गाने शिक्षक व इतर व्यवसायांमध्ये शिरकाव करुन एक स्त्री शिक्षक झाली तर संपुर्ण कुटुंबाला शिक्षीत करते ह्याची प्रचीती आणुन दिली. आता आपल्या समाजरुपी डेरेदार वृक्षाला गोड सुमधूर, सुवासीक फ़ळे, फ़ुले लागली आहेत. आज आपल्या समाजात घरटी इंजिनीअर आहेत हा उल्लेख करण्यास मला सार्थ अभिमान वाटतो. आज आपली तरुण पिढी गगनाला गवसणी घालण्यास सज्ज झाली आहे.एकविसाव्या शतकात पदार्पण करताना आपला समाज नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने विविध ठिकाणी विखुरला आहे. पुर्वी आपण ईसापनीती, परिकथेत सतासमुद्र, सप्तडोंगर असे फ़क्त ऎकत होतो, परंतु आता आपले समाजबांधव, भगिनी सतासमुद्रापार, परदेशातही वास्तव्य करुन आहेत. अशा प्रकारे विविध ठिकाणी विखुरलेल्या समाजबांधवांना एकत्र आणाणे त्यांच्यात समाजीक एकतेची भावना लावणे, समाज संस्कृतीचे संवर्धन करणे, जागतिकीकरणाच्या युगात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तरुणाईला यशाची शिखरे पार करण्यासाठी शैक्षणिक व्यवसाइक क्षेत्रात मार्गदर्शन, समाजहितासाठी आवश्यक उपक्रम राबवीणे हे प्रमुख उद्देश समाज मंडळाने आपल्या डोळ्यासमोर ठेवले आहेत. यासाठी आपल्या मंडळाकडून http://www.vanjarisamajpalghar.com ही वेबसाईट तयार करण्यात आली. समाजही आपल्या मंडळाकडे आज सकारात्मक नजरेने बघत आहे. परंतु त्यासाठी समाज बंधु-भगिनींचा, तरुण वर्गाचा, बुजुर्ग सेवानिवृत्त मंडळींचा सहभाग अपेक्षीत आहे.
ठाणे-पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळ, रजि.