"कोणत्याही भूमीत रुजावे
अशक्य ते शक्य करून दाखवावे
स्वाभिमाने कुठेही जगावे
ही तर वंजाऱ्यांची खासियत असे"
वंजारी समाजाविषयी असे म्हटले जाते, की ‘वंजारी समाज कुठेही गेला तरी आपला ठसा उमटवल्याशिवाय राहत नाही.’ हा वंजारी पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात बहुतांशी वस्ती करून राहतो. वंजारी समाजाची एकूण चोवीस गावे आहेत. त्यातील तब्बल एकोणीस गावे पालघर तालुक्यात, डहाणू तालुक्यात दोन गावे, पूर्वी महाराष्ट्रात असलेल्या आणि आता गुजराथ राज्यात असलेल्या उंबरगाव तालुक्यातील तीन गावे अशी चोवीस गावांची विगतवारी देता येईल. महाराष्ट्रात वंजारी समाजाच्या चार शाखां (जाती) चा उल्लेख आहे. 1. लाडवंजारी, 2. मथुरी वंजारी, 3. रावजीन वंजारी आणि 4. शेंगाडा वंजारी. पालघर जिल्ह्यातील वंजारी मात्र फक्त मथुरी वंजारी समाजाची आहेत. असे असले तरी महाराष्ट्रातील इतर वंजारी/बंजारा समाजाशी बेटी व्यवहार अद्यापही उघड उघड होत नाही. आता मात्र शिक्षण, ‘जातियता नष्ट करा’ शासन धोरण, बदलती सामाजिक विचारसरणी यांमुळे जातीयतेचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. ‘जातीसाठी खावी माती’ असा एकंदरीत रीवाज होता. पण आता ते कालबाह्य होऊ लागले आहे. ‘जात नाही ती जात’ असे म्हणतात ते खोटे नाही.
वंजारी समाजाचा इतिहास फार जुना असून तो मनोरंजक व रोचकही आहे. (डॉ. प्रताप च्याटे यांच्या ‘Who were Banjara’ या शोध निबंधात त्याचा आधार मिळतो.) त्या पुस्तकात ते म्हणतात वंजारी/बंजारा समाजाचा उल्लेख सिंधू संस्कृतीत असून त्याकाळी देखील वंजारी/बंजारा बैलांच्या पाठीवर अन्नधान्य लादून व्यापार करत असे. तेव्हाही त्यांचे जीवन भटके होते. तांडेच्या तांडे एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जात. सिंधू संस्कृतीत पाण्यावरूनही व्यापार करत म्हणून त्या काळी वंजारी /बंजारा व्यापाऱ्यांना ‘पणी’ म्हणत. त्यांना ‘पणी बंजारा’ म्हणून ओळखेल जाई. आर्य आणि इतर परचक्रामुळे पणी बंजारा व्यापाऱ्यांचा व्यापार संपुष्टात आला व जमिनीवरचे धान्याचा व्यापार चालू राहिला. त्यांना लमाणही म्हणत. लमाणांच्या कामाचे स्वरूप पाहता कधी सैन्याला रसद पुरव कधी गरजू लोकांना धान्य पुरवठा तर कधी जेथे जेथे मागणी असेल तेथे तांडेच्या तांडे जाऊन धान्य देत. ही भटकंती त्यांना रानावनातून, दऱ्याखोऱ्यातून, पडिक रानमाळातून करावी लागे. साहजिकच त्यांना रानावनांत तंबू टाकून वस्ती करावी लागे. वंजारी म्हणजे वनात राहणारे लोक.
वंजारी समाज उत्तर भारतातील गोर बंजारा समाजापासून उत्पन्न झाला असा उल्लेख डॉ. प्रताप चाट्ये यांच्या शोध निबंधात झाला आहे. पुढे ते भटकत व्यापार करत राजस्थानमध्ये काही काळ स्थिर झाले. पंधराव्या शतकात बंजारा हे मुख्य धान्याचे व्यापारी होते. त्यांनी मुघल सैन्यांमध्ये धान्याचे व्यापारी, पुरवठा करणारे आणि विक्रेता म्हणून कामे केली होती. अल्लाउद्दीन खिलजीने बंजारांचा उपयोग धान्यपुरवठा करून घेण्यासाठी केला होता अशी नोंद दिसून येते. उत्तर भारतात इस्लामांच्या आक्रमणानंतर गोंधळ व अराजकता माजली. तेव्हा औरंगजेब आणि महमद तुघलकाच्या सैन्यांबरोबर वंजारी/बंजारा दक्षिणेत स्थलांतरित झाले. अठराव्या शतकाच्या मध्यंतरी 1853 साली ब्रिटिशांनी रेल्वे सुरू केली. त्यामुळे बैलांवर धान्य लादून होणारा व्यापार बंद झाला. त्यामुळे ते आपले भटकंतीचे आयुष्य सोडून दक्षिण भारतात स्थिर झाले. त्याच वेळी मथुरी वंजारी काही काळ गुजराथमधील कमखल, मालव या ठिकाणी स्थिरावले. पुढे ते नारगोळ, माणेकपूर, सरई येथे काही वंजारी राहिले. त्यांची आडनावे कमलखलिया, मालव्या बंजारा आजही तेथे आहेत. ती ठिकाणे पूर्वी महाराष्ट्रात होती. गुजराथ महाराष्ट्र विभाजनाच्या वेळी ती गुजराथमधील उम्बरगाव तालुक्यात गेली ती तीन गावे होत.
काही तांडे नारगोळहून समूद्रमार्गे ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील पूर्वीच्या ‘मोरडी’ बंदरात आजच्या ‘मुरबे’ बंदरात उतरली. अनेक तांडे उतरले त्यांपैकी एकोणीस तांडे पालघर तालुक्यात विखुरले. त्यांची एकोणीस गावे झाली. डहाणू तालुक्यात देदाळे, कलोलीर गाव अशी चोवीस गावांत वंजाऱ्यांची वस्ती झाली व तांडे स्थिर झाले.
भादवे गावात स्थापना केलेले वंजारी दैवताची मूर्ती आजही शाबूत आहे. लग्नात व मुंजीत जानवे परिधान करताना देवाच्या दिशेला तोंड वळवून ‘मी जानवे परिधान करतो’ असे म्हणून वंदन केले जाते. लग्नात रणदेवतेची पूजा आवर्जून केली जाते. अशा प्रकारे देवदेवतांना, रीतीभातींना मानले जाते.
इस्लामांच्या भीतीने अत्यंत काळजीपूर्वक जपून आणलेल्या प्रत्येक तांड्याच्या कुळदेवता त्यांची निगा ठेवण्यासाठी व पूजा-अर्चा करण्यासाठी आपल्या जवळच्या पुरोहितांकडे सुपूर्त केल्या. जेव्हा मंगल कार्ये निघतात तेव्हा घरी आणली जाते. त्यांची यथासांग पूजा केली जाते. कार्य संपल्यावर पुन्हा पुरोहितांकडे दक्षिणा देऊन परत केल्या जातात. हे रीतीरिवाज आजही पाळले जातात.
व्यवसाय/उद्योगधंदे –
पालघर तालुक्यात आताच्या नवनिर्मित जिल्ह्यात वंजारी समाज आला तेव्हा त्यांच्याकडे ना व्यापार ना कोणता उद्योगधंदा उरला होता. त्यांनी जीवन जगण्यासाठी बैलगाडीचा आधार घेतला. त्यांच्या जीवनात बैल हा जोडीला मुख्य प्राणी होता. पूर्वी आजन्म बैलांच्या ताकदीवर ते व्यापार करून जगले. आताही त्यांना जीवन जगण्यासाठी बैल या प्राण्याचा आधार घ्यावा लागला. बैलांवर वंजारी समाज जीवापाड प्रेम करत. अगदी आपल्या मुलाबाळांसम बैलांची दक्षता घेत. बैलगाडी तयार करून लाकडे वाहण्याचा धंदा कर, भात खरेदी-विक्री धंदा, मीठाची विक्री करणे, पालेमोड धंदा असे व्यवसाय आणि मच्छिची (सुकी) विक्री करून जगण्यास स्थिर झाले. पुढे थोड्याफार प्रमाणात पैसे जमवून शेती घेतली व शेती करू लागले. धंद्यातील चिकाटी व परिश्रमाला पर्याय नाही या तत्त्वाला धरून ते जीवन जगत होते. पुढे तर यांत्रिकीकरणाच्या विकासाने ट्रक, लॉरी, टेम्पो अशी वाहतुकीची अवजड वाहने निघाल्याने बैलगाडीचे धंदे बसले. ‘बैल लंगडा झाला तर संसार लंगडा’ मात्र बैलगाडीचा धंदा संपल्याने जीवन पूर्ण उध्वस्त झाल्यासारखे झाले. शेतीत केवळ जगण्यापुरते धान्य होई, तेही एकच पीक भाताचे निघे, केवळ पावसाच्या लहरीवर! पुढे भारत देश स्वतंत्र झाल्यावर शिक्षणाचा प्रसार झाला आणि त्यात ही जात OBC मध्ये आणली गेली. 13% आरक्षणाचा फायदा उठवला. अत्यंत परिश्रमाने हलाकीच्या जीवनात नेटाने प्रयत्न करून नोकऱ्या मिळवल्या व जीवनाचे गुजराण करू लागले. अगदी काहींनी उच्चपदाच्या नोकऱ्याही मिळवल्या. आता पुन्हा NTD मध्ये वर्ग केल्यामुळे व 2% आरक्षणामुळे नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले. पुन्हा जीवन जगण्यासाठी संघर्ष वाढले आहेत.
पोशाख –
पूर्वी पुरुष जाडेभरडे कपडे - पागोटे, कफनीवजा बंडी, धोतर गुडघ्यापर्यंत नेसत. मध्य काळात लेंगा, टोपी, आखूड, तोकडी पतलून वापरत. आताच्या काळी आधुनिक कपडे वापरतात. स्त्रिया पूर्वी गुडघ्यापर्यंत लुगडी नेसत, डोक्यावर पदर घेत आणि अंगात काचोळी (कासळी) घालत. मध्ययुगीन काळात आडवे लुगडे, डोक्यावर पदर नाही. अंगात ब्लाऊज घालत. अंगावर चांदी-सोने-पितळेचे दागिने घालत. अगदी प्राचीन काळापासून स्त्रियांना दागिन्यांची हौस दिसून येते. आजही तो रीवाज आहेच.
आहार –
प्राचीन काळी ही जात मांसाहारी होती. परंतु गुजरात राज्यातील निवास स्थानापासून ते पूर्ण शाकाहारी झाले. विविध प्रकारच्या डाळी-पालेभाज्या-फळभाज्यांचा वापर आहारात होतो. पालघर तालुक्यात आल्यापासून समुद्र सानिध्य, मासळी भरपूर त्यामुळे ते पुन्हा मांसाहारी झाले. त्यांना ‘शेंगोळा’ नावाचा मासा अत्यंत रुचकर वाटे. पूर्वी स्त्रीपुरुष दोघेही धुम्रपान करत. पुरुष मात्र दारूचा वापर करत. आता स्त्रिया धूम्रपान मुळीच करत नाहीत. पुरुषांनी मात्र दारूचा त्याग हवा तसा केलेला नाही. या जातीतील लोकांना बकऱ्याचे मटण प्रिय आहे. मात्र मटण मसालेदार व तिखट हवे. ही त्यांची परंपराच आहे.
भाषा –
वंजारी भटके. त्यामुळे जेथे जेथे काही काळ स्थिरावले, तेथील बोलीभाषांचा परिणाम वंजारी बोलीभाषेवर झाला. गुजराथी बोलीभाषा, राजस्थानी-भोजपुरी बोलीभाषा, महाराष्ट्रीय बोलीभाषा अशा या सर्व बोलीभाषांचे मिश्रण पूर्वीच्या वंजारी बोलीभाषेवर होऊन, ती किचकट बेमालूम येत नाही. या वंजाऱ्यांची बोलीभाषा वंजारी बोलीच आहे.
सांस्कृतिक जीवन -
या वंजारी समाजाला स्वतंत्र असे वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक जीवन नाही. नेहमीच्या भटकंतीमुळे अस्थिर जीवन. त्यामुळे कला, क्रीडा, गायन, वाद्य या गोष्टींकडे वेळ देता आला नसेल. त्यामुळे सांस्कृतिक जीवनाचा अभाव दिसून येतो. आजही प्रभावीरीत्या गती दिसून येत नाही. करमणुकीसाठी बहुरुपीसारखे ते तुरळक कार्यक्रम करत असा उल्लेख कुठे कुठे दिसून येतो. नाच-गाणे ही त्यांची रीत नाही.
लग्न, मुंज व इतर धार्मिक चालीरीती –
फार पूर्वी अठराव्या शतकात बालविवाह होत. यात विविध प्रकारच्या चालीरीतींचा प्रभाव होता. मुलीच्या वडिलांना देज देणे, लग्नाचा खर्च वराच्या बापाने करणे, लग्नात मुलाच्या मामाने वराला घोड्यावर बसवून मामसाळा काढणे, मामसाड्यातील जमलेल्या लोकांना दारू पाजून वराला घराघरांतून फिरवून सन्मान करणे. वरघोडा काढणे. रुहणा काढणे. वाद्यवाजंत्री घेऊन गावातील लोकांना सन्मानाने बोलावून भोजन घालणे. लग्न चार दिवस धूमधडाक्यात चाले. आजमितीला सर्व कार्यक्रम कमी करून हळदीचा कार्यक्रम साग्रसंगीत चालतो. मुंज सात/आठ वर्षांच्या मुलाची केली जाते. लग्नविधीप्रमाणे जानवे परिधान करणे, बटुकाला शिक्षणासाठी प्रवृत्त करणे, त्यातीलच एक प्रकार कानविंदणे. बकऱ्यावर बसवून बकरा देवीला बळी देणे व कानात सोन्याची बाळी घालणे. ही प्रथा आता कालबाह्य होत आहे.
अंत्यविधी करणे –
मृताच्या आत्म्याला त्रास होऊ नये, आत्मा भटकत फिरू नये म्हणून व्यक्ती मृत्यू पावल्यापासून विविध विधी करून, अकराव्या/बाराव्या दिवशी श्राद्ध घालून आत्म्याला मुक्त करण्याचा हा विधी पिंडदान करून करतात. लोकभोजन दिले जाते. पुरोहिताला मृताला लागणाऱ्या सर्व वस्तू दान करतात. त्यात स्वर्गप्राप्तीसाठी सागर पोहून जाण्यासाठी गोदानही (गाय) केले जाते. तशी परंपरागत चालत आलेली ही रीत आहे. सोळा संस्कारांपैकी ओटी भरणे (गर्भ संस्कार), नामकरण विधी, मुंज, लग्न व मृताचे अंत्यसंस्कार केले जात.
धार्मिक सण, पूजाविधी –
त्यांचे रानावनातील जीवन, त्यामुळे हिंस्रश्वापदे, निसर्गाचा विविध प्रकारे होणारा प्रकोप यामुळे भीतीपोटी व संकटे निवारण्यासाठी निसर्ग पूजाकडे वळले. पूर्वीपासून बंजारा समाज पिंपळाची पूजा करत. पुढे पुढे वड, बोर, रांजण या झाडांची पूजा करणे. वेगवेगळ्या तांड्यांनुसार स्विकारले. झाडांची पूजा ही चालीरीतीच झाल्या. प्रत्येक तांड्यांनी त्यानुसार आपली आडनावे लावली. आजही वडे, बोरे, पिंपळे ही आडनावे या समाजात प्रचलित आहेत.
होळी, दीपावली, रामनवमी, कृष्णाष्टमी, गुढीपाडवा असे उत्सव साजरा करून, देवदेवतांची पूजा करणे प्रचलित झाले. आजही मोठ्या आनंदाने हे उत्सव साजरे केले जातात. धार्मिक चालीरीती परंपरागत समाजात चालू आहेत. व्रत-वैकल्ये, हवन, पूजा-अर्चा यांचे प्रस्थ सद्या कमी कमी होताना दिसू लागले आहे. हिंदू धर्मातील सर्व सण यथासांग करण्याची रीत प्रचलित आहेत. मूर्ती पूजा केली जाते. उपास-तापास केले जातात. उपवास, धार्मिक विधीच्या वेळी आहारात मटण, मासे खात नाहीत.
पूर्वी भटकंतीमुळे गाव स्थिर नसत. त्यामुळे वंजाऱ्यांच्या वस्तीत मंदिरे, देवळे दिसत नाहीत. राहण्याचे स्थान, गाव निश्चित झाल्यावर मंदिरे दिसू लागली आहेत. आता मोठ्या उत्साहाने मंदिरे उभारू लागले आहेत.
समाजातील सामाजिक, राजकारणी धुरीण (व्यक्ती) -
समाजात पूर्वी समाजासाठी झटणारे सामाजिक नेतृत्व होते. मात्र त्याकाळी राजकारण आजच्याइतके प्रभावी नसल्यामुळे राजकारणी नव्हते. तथापी, काही व्यक्तींचा नामोल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.
लाखो तांड्याचा मालक लाखी शहा बंजारा सोळाव्या शतकात होऊन गेला. हा अत्यंत शूर लढवय्या बंजारा होता. आजही येथील वंजारी त्यांचा नामोल्लेख करतात. तो समाज शीख धर्माची सेवा करत होता. ज्याअर्थी ह्यांचा उल्लेख होतो त्याअर्थी या वंजारी समाजाची जवळिकता असणार हे निश्चित. आता कोणी एखादा वंजारी आपली संपत्ती, रुबाब याची मिजास, गर्व करत असेल तर “वंजाऱ्यांचे काही राहिले नाही, तेथे तुझी मिजास काय चालणार? गप्प बस!” अशी खडसावते. मधल्या काळात, धावपळीच्या काळात नामोल्लेख नाही. मात्र पालघर जिल्ह्यात हा समाज स्थिर झाल्यावर काही व्यक्तींचा नामोल्लेख दिसून येतो.
1. नाना पाटील (मासणगाव) – समाजाचा क्रियाशील कार्यकर्ता, समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक कामासाठी सतत झटत राहिले.
2. मुकुंद जीवन संख्ये (बांधणगाव) – वंजारी समाजात पहिला आमदार, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी जवळचा संबंध, वसंतराव नाईक हेही रावजीन बंजारा समाजाचे. त्यांच्या साहाय्याने, मदतीने समाजाचे अनेक प्रश्न सोडवले.
3. पांडोबा पाटील – त्याकाळचे प्रसिद्ध वकील. मूळ गाव बोईसर. समाजाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा हातभार असे. निरपराधपणे गुन्ह्याच्या केसेसमध्ये गोवलेल्या लोकांना मुक्त करण्यासाठी झटले.
4. बाबुराव पटेल (मासवण) – सधन शेतकरी, समाजप्रिय, शांततावादी. कालबाह्य, समाजविघातक रुढी, परंपरा, चालीरीती बंद करण्यासाठी झटले.
5. गोविंद वंजारा – ब्रिटिशकालिन फौजदार, माणेकपूर. समाजाहद्दल आपुलकी, योग्य तेथे समाजाला सहकार्य केले.
6. त्र्यंबकभाई पटेल – वंजारा समाजात सामाजिक व धार्मिक भाव रुजवला. हे माणिकपूरचे राहणारे.
7. ठाकोर वंजारा (नारगोळ) – गवताचा व लाकडांचा प्रसिद्ध व्यापारी.
8. बाबाजी पाटील (कोळगाव), श्री गणपत संख्ये (पर्नाळी) – समाजासाठी झटणारे नेतृत्व
समाजाच्या सामाजिक प्रगतीसाठी अनेक नेते झटले. तसेच, शैक्षणिक प्रगतीसाठी काही शिक्षक उत्स्फुर्त झटले. समाजाची बांधीलकी मानून सतत कार्यरत राहिले. पदरमोड करून विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक मार्गदर्शन केले. यात महादेश कुशा पिंपळे (मोरे कुरण), ल.झा. संख्ये (एकलारे), भा.के. पिंपळे (दापोली), दा.मु. संख्ये(दापोली), ज.वि. संख्ये (कोळगाव), के.रा. संख्ये (एकलारे) असे अनेक शिक्षक समाजातील शैक्षणिक उन्नतीसाठी झटले आहेत. ज्यांचा नामोल्लेख लेखन मर्यादेमुळे करता आले नाही. प्रत्येक गावातील पाटील, सरपंच यांचाही समाजोन्नती योगदान आहे हे नाकारता येतच नाही.